History

|| श्री गुरुदेव दत्त ||
श्री क्षेत्र औदुंबर – संपूर्ण माहिती
(संकलक - गिरीश विश्वनाथ जोशी)

भगवान दत्तात्रेयांचे (दत्त महाराजांचे) द्वितीय अवतार श्री नृसिंहसरस्वती दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले क्षेत्र म्हणजे भारत वर्षात, महाराष्ट्र प्रांतात, सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील श्री क्षेत्र औदुंबर.





“औदुंबर जगत् विख्यातम्” असे ज्या क्षेत्राचे वर्णन आहे निसर्गत:च लाभलेली नैसर्गिक पार्श्वभूमी महाबळेश्वर पासून उगम पावणारी, शांत वाहणारी  कृष्णामाई पलीकडे  भुवनेश्वरवाडी येथे वसलेली प्राचीन जगदंबिका भुवनेश्वरी देवी अलिकडील तिरावरच्या विस्तीर्ण घाटावर  वसलेले श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांचे विलोभनीय दत्त मंदिर.

अनुसया-अत्रि-पुत्र दत्तात्रायांचा पहिला अवतार आंध्र प्रदेशातील पीठापूर येथे आपळराजा व सुमती या ब्राह्मण दांपत्याच्या घरी झाला. या अवतारात त्यांनी लोकोद्धाराचे  कार्य केले. त्याप्रमाणे महाराष्ट्र प्रांतात अकोले जवळील लाड कारंजे या ठिकाणी अंबा माधव या ब्राह्मण दांम्पत्याच्या घरी दुसऱ्या अवतारात त्यांनी जन्म घेतला, व तेच पुढे श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज म्हणून जगद्विख्यात झाले. लहानपणी त्यांचे नाव नरहरी असे ठेवले.त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती लहानपणापासूनच त्यांच्या आई-वडिलांना येऊ लागली.ज्याला हात लावावे,त्याचे सोने व्हावे  अशी त्यांची कीर्ती. वयाच्या आठव्या वर्षी मौजीबंधन झाल्यावर पुढील धर्म कार्यासाठी बाहेर पडण्याची अनुमती मिळावी अशी त्यांनी आई-वडिलांना विनंती केली अत्यंत जड अंतकरणाने आई-वडिलांनी त्यांना परवानगी दिली ते कारंजा इथून काशी या धर्मक्षेत्री आले.  तिथे त्यांनी प्राथमिक वेद अध्ययन पूर्ण केले. त्यांच्यातील अलौकिक दिव्यत्वाची प्रचिती सर्वांना आली  आणि म्हणूनच कृष्णसरस्वती  या यती महाराजांनी  त्यांना संन्यास दीक्षा घेण्याची आज्ञा केली. त्यांच्या आज्ञेनुसार संन्यास दीक्षा घेऊन धर्मप्रसाराच्या कार्यासाठी बाहेर पडले. अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देत देत ते औदुंबर या क्षेत्री आले.

महाराजांना येथील निसर्गत:च शांत व रमणीय असलेला परिसर पाहून एक चातुर्मास करण्याची इच्छा झाली त्यावेळेस औदुंबर हे केवळ जंगल होते अन अंकलखोप  हे मूळ गाव. कोणीतरी संन्यासी महाराज औदुंबर येथे आले आहेत अशी माहिती मिळाल्यावर गावातील स्त्रिया व पुरुष व प्रमुख मंडळी त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागली.महाराजांचा चातुर्मास चालू असताना, चातुर्मास म्हणजे जे संन्यासी यति असतात त्यांनी चार महिने एकाच स्थानावर राहून  जप,तप, साधना करायची असते या काळात त्यांना ते स्थान सोडता येत नाही. या दरम्यान एक अलौकिक घटना औदुंबर क्षेत्री घडली.

करवीर (कोल्हापूर) क्षेत्री चा एक मूढ ब्राह्मण ज्याला  विद्या अजिबात नव्हती, त्याचे वडील हे दशग्रंथी ब्राह्मण होते पण मुलगा मूढ निपजला. सर्व लोक त्यांची निंदा करू लागले ते सहन न होऊन तो मुलगा घराबाहेर पडला मजल दर मजल करत तो भिलवडी जवळील भुवनेश्वरी या  ठिकाणी आला. तेथे त्यांनी भुवनेश्वरी देवी समोर आठ दिवस देवीची करुणा भाकली तो रात्रंदिवस आक्रोश करीत होता मला विद्या नाही विद्या दे  म्हणून देवीला प्रार्थना करत होता. तरीही देवी त्याला प्रसन्न झाली नाही आता मात्र त्याचा धीर संपला त्याने आपली जीभ कापून देवीच्या चरणावर वाहिली आणि आता जर तू मला प्रसन्न  प्रसन्न झाली नाहीस  तर माझे मस्तक तुझ्या चरणावर वाहीन अशी त्यांने प्रतिज्ञा केली, तेंव्हा  मात्र जगन्माता भुवनेश्वरी त्या कुमाराला प्रसन्न झाली व त्या कुमाराच्या पाठीवरून हात फिरवला व त्यास सावरले. विद्यादान हे माझे कार्य नाही तू पलीकडच्या तीरावर जा तेथे औदुंबराच्या वृक्षाखाली जे संन्यासी बसले आहेत त्यांचे दर्शन घेईल म्हणजे तुला विद्या येईल.

औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी |
अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांच्छा पुरवील ||


तो कुमार पोहत अलीकडच्या तीरावर आला. देवीने सांगितल्याप्रमाणे महाराज औदुंबराच्या वृक्षाखाली पद्मासनात बसले होते तेथे पूर्वी उंबराची खूप झाडे होती त्यामुळे या क्षेत्राला औदुंबर  असे नाव पडले. औदुंबर म्हणजे उंबर,महाराजांनी औदुंबरला कल्पवृक्ष म्हटले आहे जी तुमची मनोकामना असेल त्या वृक्षाला प्रार्थना केल्यास पूर्ण होते.तो कुमार आक्रोश करीत महाराजांच्या चरणावर आला त्याने लोळण घेतली आपल्या अश्रूंचा अभिषेक त्यांनी महाराजांच्या चरणावर केला महाराजांनी त्यास प्रेमभराने आलिंगन दिले व विचारले बाळ तुझी काय इच्छा आहे त्यांनी अत्यंत सद्ग्तीत होऊन सांगितले महाराज मला बाकी काही नको आपल्या चरणाजवळ मला जागा द्या त्यांच्या दिव्य स्पर्शाने त्या कुमारची जीभ परत आली व त्यास विद्या प्राप्त झाली. त्यामुळे औदुंबर ही तपोभूमी बरोबर ज्ञानपीठ आहे तेव्हापासून या क्षेत्राचे महत्त्व वाढू लागली दूरदूरचे लोक या ठिकाणी श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्यामुळे आपल्या साधनेत व्यत्यय येऊ नये व चातुर्मास पूर्ण होत आल्याने महाराजांनी सर्व दत्तभक्तांना प्रेमभराने निरोप घेतला “विमल पादुका” रुपाने माझे निरंतर या ठिकाणी वास्तव्य राहील असे सांगितले विमल म्हणजे ज्यांच्या पादुकांच्या दर्शनाने मनाचे मालिन्य दूर होते त्यांना विमल असे म्हणतात.

सर्व दत्त भक्तांनी त्यांना साश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिला व श्री क्षेत्र नृसिंहवाडी त्यांनी प्रयाण केले. नृसिंहवाडी येथे त्यांचे बारा वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी अनेकांचा उद्धार केला व आपल्या दिव्य चमत्कारांनी  भक्तांना अचंबित केले तिथून महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे प्रयाण केले, तेथे त्यांचे  24 वर्ष वास्तव्य होते. आपल्या कार्यामुळे त्यांना अनेक शिष्य लाभले आपल्या अंगी असलेल्या अद्भुत सामर्थ्यामुळे त्यांनी अनेक सामान्य जीवांचा  उद्धार केला अनेकांची दुःख संकट निवारण केले आपल्या अवतार समाप्तीची आता वेळ आली आहे याची जाणीव होऊन सर्वांचा निरोप घेऊन महाराज हैदराबाद येथील श्री शैल्य जवळील पातळ गंगेच्या नजीक कर्दळीवनात गुप्त झाले. तेच पुढे स्वामी समर्थ रूपात प्रकट होऊन अनेक दत्तभक्तांना सन्मार्गाला लावले अशी साधारणपणे दत्त आख्यायिका व महिमा आहे.

संत श्रेष्ठ एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज जनार्दन स्वामी यासारख्या दिव्य विभूती या औदुंबर  ठिकाणी येऊन दत्त महाराजांचे दर्शन घेऊन गेले आहेत. तसेच कर्नाटक प्रांतातील नारायणानंद तीर्थ स्वामी महाराज हे दत्तावतारी विभूती या ठिकाणी होऊन गेले आहेत. गिरनार येथे तपश्चर्या करीत असलेले ब्रह्मानंद स्वामी महाराज दत्त महाराजांच्या आज्ञेने औदुंबर या क्षेत्री आले.

औदुंबर चे दत्त कवी  सुधांशू यांनी “दत्त दिगंबर दैवत माझे” व अनेक भक्तिगीते व दत्तगीते लिहून गावचा व देवस्थानचा लौकिक वाढवला आहे. दसऱ्याच्या दिवशी पालखी फुलांच्या माळांनी सुशोभित केली जाते व श्रींची उत्सव मूर्ती पालखीत स्थानापन्न करून ग्रामप्रदिक्षणा होते. चातुर्मासात पालखी सेवा बंद असते ती दसऱ्यापासून आषाढी द्वादशीपर्यंत सुरू असते.

गुरु पौर्णिमा, दत्तजयंती, महाशिवरात्र, गुरुप्रतिपदा, अक्षय तृतीया, नृसिंहसरस्वती जन्मोत्सव, निर्वाण उत्सव, औदुंबर पंचमी, विशेष उत्सव मोठ्या उत्साहाने इथे साजरे होतात. गुरुचरित्र पारायण जपानुष्ठान व इतर धार्मिक कार्यक्रमासाठी हे स्थान अत्यंत पवित्र असल्याने महाराष्ट्रातून अनेक दत्तभक्त याठिकाणी येऊन महाराजांची सेवा करतात व त्यांच्या पूर्णकृपेस पात्र होतात.औदुंबर ही  ज्ञानभूमी व तपोभूमी आहे. सर्वांना याचा प्रत्यय येत आहे दत्त म्हणजे देणे महाराजांच्या कडे जे तुम्ही मागाल ते देतात असा सर्वांना अनुभव आहे दिवसेंदिवस या क्षेत्राची ख्याती व महिमा सर्वदूर पसरत आहे.

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||