वंशविस्तार हि विवाहसंस्थेबरोबर आवश्यक मानली गेलेली बाब. वेदकालापासून या वंशविस्ताराकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले गेले आहे. विवाहसमयी घोषित केल्या जाणाऱ्या मंत्रोच्चारात दशास्यां पुत्रमाधेहि ll ( दहा पुत्र ) हा उल्लेख किंवा अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हा आशीर्वाद हे त्याचेच प्रतीक आहे . वेदकाळात तर निसर्गातील सर्व घटकांना आमचा वंश वाढो अशा प्रकारची प्रार्थना असे. शुक्ल यजुर्वेदात दुर्वेची प्रार्थना केली आहे. काण्डात्काण्डात्प्ररोहन्ति ---- ll (शुक्ल यजु ) हे दुर्वे ,प्रत्येक कांडापासून व प्रत्येक पेरापासून तू जशी अंकुरित होतेस व पसरत जातेस तव्दत् आमचा वंशही तू हजारो पटींनी वाढेल असे कर . खेरीज ऋग्वेदात प्रजावन्नः पशुमाँ ---- ll आमचे घर मुलाबाळांनी आणि गाई घोड्यानी गजबजून जाईल असे करा.
पण हा वंशविस्तार कसा हवा याचे अनेक दाखले गुरुचरित्रात आणि दत्त माहात्म्यात आहेत. गुरुचरित्रात पुत्रकामना करताना अनसूया माता म्हणते आहे, तिघे बाळक माझे घरी l राहावे माझे पुत्रापरी ll (४/६१) आणि दत्त माहात्म्यात या पुत्रकामनेमागचे कारण माता सांगत आहे , पुत्रभावेंकरून l तुझे करिता लालन पालन l जाईल आमुचे मायावरण l म्हणोनि चरण धरियेले ll (द मा ३/४९) पुढील अवतारात सुमती माता म्हणते आहे ,व्हावा पुत्र मज ऐसा l ज्ञानवंत पूर्ण पुरुषा l जगव्दंद्य वेदसदृशा l तुम्हा सारिखा दातारा ll हे भगवंता तुझ्यासारखा पुत्र दे. आता दत्त महाराजांसारखा कोण आहे ? त्यांनाच अवतार घेणे प्राप्त आहे.
मनातील दृढ हेतू हा कि पुढील पिढी हि भगवंताचे स्वरूप असावी मात्र हे नाही झाले तर कमीतकमी दत्त महाराजांचा आशीर्वाद तरी पुढील पिढीमागे असावा हा हेतू नित्य असे. सायंदेवापासून ते गंगा या स्त्री पर्यंत सर्वानी आपापल्या संततीला महाराजांच्या पायावर घातलेले दिसून येते . आता प्रश्न हा कि दत्त महाराजांच्या अवतार काळात पुढील पिढीला किंवा संततीला पायावर घातले . या घटकेला तारक कोण ठरणार ? यावर एक छान उदाहरण दत्त माहात्म्यात आहे . आपल्या पुत्राची ग्रहदशा योग्य नाही हे पाहताच मदालसेने दत्त महाराजांची प्रार्थना केली आणि ती म्हणाली ,पुढे उद्धरी अधोक्षजा l अत्रिजा हा तुझ्या वाट्याचा ll दत्त महाराजांना प्रार्थना केली कि त्यांनी पदरात घेतले म्हणून समजा . कोणत्याही औपचारिकतेची गरज नाही.पुढे उद्धार कसा करायचा ते दत्त महाराज पाहून घेतात.
ज्याचे हृदयी गुरुस्मरण l ज्याने नित्य दत्त महाराजांचे स्मरण ,चिंतन केले त्याचे सर्व संचित भस्म झाले ,प्रारब्ध दत्त झाले आणि क्रियमाण शून्य झाले . श्रीगुरुदेव दत्त !!!---