दत्त माहात्म्यात आलेली जडमूढ ब्रह्मनिष्ठाची कथा आणि आचार्यांच्या चरित्रातील प्रभाकरपुत्र हस्तामलकाची कथा साधारणपणे एकाच प्रकारची आहे . दत्त माहात्म्यात हि कथा इंद्र आणि बृहस्पती यांच्या संवादात आलेल्या सात गाथांपैकी एक आहे . विष्णुदत्त हा दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झालेला असा महासामर्थ्यशाली ब्राह्मण . ग्रहभूत डचकती l विष्णुदत्ता देव भीती ll या शब्दात विष्णुदत्ताचे वर्णन आहे या वरून कल्पना यावी .
एकदा या विष्णुदत्ताच्या घरी एका मुलाला घेऊन त्याचे आई वडील आले . हा मुलगा म्हणजे पूर्वजन्मीचा योगभ्रष्ट ब्रह्मज्ञानी होता मात्र या जन्मी या नश्वर संसाराला भिऊन तो व्यर्थ उद्योग करीत असे . सर्व विषयभोगांना विष मानून आपल्याला किंचितही मान मिळू नये यास्तव तो लोकांचा संग टाळत असे . विष्ठामूत्रात लोळणाऱ्या या मुलाने सर्वसामान्य लोकांप्रमाणे वागावे म्हणून माता पित्याने फार कष्ट घेतले होते .(दत्त माहात्म्यात याची यादीच दिली आहे .) अनेक व्रते ,नियमित देवपूजन ,हातात कवच वगैरे बांधणे ,दानधर्म ,वैद्यांची औषधे ,तीर्थयात्रा ,नाना जप ,शांती ,अंगारे अथवा विभूती लावणे वगैरे वगैरे ....
थोरले महाराज यावर म्हणतात , काही नोहे